
मांडवे- पाटीलमळा ते पालवेवस्तीला जोडणारा डांबरी रस्ता 70 वर्षांनी होतोय:पाच किमीच्या रस्त्यासाठी करावा लागला संघर्ष, 200 मीटरसाठी होता वाद
मांडवे-कन्हेर-जळभावी या प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणारा मांडवे (ता. माळशिरस) येथील पाटीलमळा ते पालवे-गोरे वस्ती पर्यंतचा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला. नुकतीच या रस्तेकामाची सुरूवात झाल्याने तब्बल ७० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या भागातील नागरिकांना डांबरी रस्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात येत असून,सर्व काम झालेले होत पण दोन ठिकाणी पोलीस बंदोबस्त मध्ये काम करण्यात आले यासाठी कार्यकारी अभियंता एन. पी. जाधव, उपअभियंता विराज पाटील, कनिष्ठ अभियंता एम. सी. माने, सहाय्यक कनिष्ठ अभियंता, एस. एस. मुलानी हे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे निरीक्षक परजणे व दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मंडळ अधिकारी घुगे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीने निर्णय घेतला. या ऐतिहासिक कामासाठी शेतकरी विजय पालवे व विठ्ठल दुधाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच रितेश पालवे-पाटील, उपसरपंच सुरज साळुंखे पाटील, कुमार पाटील, दत्ता गायकवाड यांच्यासह पालवे, दुधाळ, गोरे, लवटे, भुजबळ, काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ५ कोटी निधी माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून सुमारे पाच कोटी रुपयांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला होता. तर विद्यमान सरपंच व उपसरपंच यांच्या कार्यकाळात तो पूर्णत्वास गेला आहे. दोन शेतकऱ्यांतील वादामुळे रखडला होते काम मांडवे-कन्हेर-जळभावी या प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या पाटील मळा ते पालवे-गोरे वस्ती हा सुमारे ५ किमी रस्त्यापैकी साधारण २०० मीटर रस्ता दोन शेतकऱ्यांनी अडविला होता. संबंधित शेतकरी या रस्त्याचे डांबरीकरण होऊ देत नव्हते. यावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे या मार्गाचा डांबरीकरणाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.