News Image

विठ्ठल नामाच्या गजरामध्ये अंध वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:दररोज दहा किलोमीटरचा प्रवास, पंढरपूरात गुंजणार अभंगाचे सूर


विठ्ठलाच्या जयघोषामध्ये 15 अंध वारकऱ्यांच्या दिंडीचे गुरु रविवारी तारीख 8 हिंगोली येथून पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे. चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही दिंडी सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी या वारकऱ्यांकडून अभंगाचे सूर अळवले जाणार आहेत. देशात प्रथमच अंधांची दिंडी निघाली असून नागरिकांसाठी हा कौतुकाचा विषय बनला आहे. दरवर्षी लाखो भाविक आषाढी एकादशीनिमित्त वारीने पंढरपूर येथे जातात. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांसह बालकांचाही समावेश असतो. जय जय राम कृष्ण हरी चा गजर करीत शेकडो दिंड्यातील वारकरी पंढरपूरला पोहोचतात. त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन वारकरी परतीला लागतात. दरम्यान वाशिम येथील एका संस्थेचे पदाधिकारी सदानंद तायडे यांनी अंध वारकऱ्यांच्या दिंडीचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या संस्थेमध्ये अंध वारकरी उच्चशिक्षित असून अनेक ठिकाणी अभंग गायनाचे कार्यक्रम करतात. अभंग गायनामुळे या अंध वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीची ओढ लागली मात्र परिस्थितीवर कशी मात करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यातून सदानंद तायडे यांनी पुढाकार घेऊन 15 अंध वारकऱ्यांची दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. आपणही पंढरपुरात जाऊ शकतो असा आत्मविश्वास बाळगून हे वारकरी तारीख एक जून पासून पंढरपूरकडे निघाले आहेत. दरम्यान हिंगोली येथे आज या वारकऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या नाश्ताची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर हे वारकरी पंढरपूर कडे मार्गस्थ झाले. या संदर्भात सदानंद तायडे यांनी सांगितले की, अंध वारकरी उच्चशिक्षित आहेत याशिवाय अभंग गायनाचे कार्यक्रम करतात. त्यामुळे या वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार तयारी सुरू केली आणि पाहता पाहता दानशुरांकडून मदतीचा हात मिळू लागला. नाश्ता चहापाणी भोजन व मुक्कामाची व्यवस्था पालखी मार्गातील गावातील गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळेच या वारकऱ्यांची दिंडी घेऊन निघालो आहोत. दररोज दहा किलोमीटरचा प्रवास करून चारशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तारीख 6 जुलै रोजी आमची दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे. त्या ठिकाणी या वारकऱ्यांकडून अभंग गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंध वारकऱ्यांच्या दिंडीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.