
नीतेशने जपून बोलावे, आपण महायुतीत आहोत हे विसरू नये:नीलेश राणे यांचा भावाला सल्ला
धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात मंत्री नीतेश राणे यांनी दिलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेची नवी लाट निर्माण झाली आहे. शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधत नीतेश राणे यांनी, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. या वक्तव्यावर आता नीतेश राणे यांचे बंधू आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणे यांनी लिहिले, नीतेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. नीलेश राणे यांच्या या प्रतिक्रियेमुळे नीतेश राणे यांच्या भाषणशैलीवर आणि वक्तव्यांवर भाजपमध्येच अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन प्रमुख घटक असून, त्यांच्यात सुसंवाद आणि समन्वय राखणे ही दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अशा वेळी, नीतेश राणे यांचं विधान हे आक्रमक आणि उद्दाम असल्याचे भाजपच्या अंतर्गत काही नेत्यांना वाटतंय, हे नीलेश राणे यांच्या प्रतिक्रियेतून सूचित होत आहे. नेमकं काय म्हणाले होते नीतेश राणे? धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सध्या वाद सुरु आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली. यावर बोलताना नीतेश राणे यांनी मेळाव्यात सांगितले की, कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले, तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा. या विधानामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी महायुतीतील एकोपा टिकवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.