
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण:प्रकाश आंबेडकरांचा न्यायालयात युक्तिवाद, SIT स्थापन करण्याची मागणी
परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी झालेल्या सुनावणीत, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत कायद्यात अपूर्णता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. याबाबत कायद्यातील तरतूद पूर्ण करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावर आंबेडकर म्हणाले, कायद्यातील तरतुदी पूर्ण करावी ही आमची ठाम मागणी होती, जी न्यायालयाने समजून घेतली असून याबाबत “कायदा असला पाहिजे” असे स्पष्ट मत मांडले आहे. तसेच या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची आंबेडकर यांनी दुसरी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्याने पोलिसांकडून चौकशी न होता स्वतंत्र SIT द्वारे तपास व्हावा, ही आमची भूमिका न्यायालयाने ऐकून घेतली आहे. लवकरच यासंदर्भातील आदेश अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. या संदर्भात दोन स्वतंत्र आदेश येण्याची अपेक्षा आहे. कायद्यातील त्रुटी दूर करण्यासंदर्भातील तसेच SIT नेमणुकीसंदर्भातील या संदर्भात न्यायालय काय भुमिका घेणार याकडे आता लक्ष असेल. तसेच या प्रकरणाचा जो निर्णय येईल तो निर्णय देशभरातील न्यायालयीन कोठडीत होणाऱ्या मृत्यू प्रकरणांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. नेमके प्रकरण काय? परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात कुटुंबीयांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मांडत आहेत.