
कामाच्या अतिताणामुळे डॉक्टरची आत्महत्या:पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना; वसतिगृहातच घेतला गळफास
गुजरातच्या भावनगर येथील डाॅ.श्याम व्हाेरा (वय- २५) हा तरुण पुण्यातील नामांकित रुबी हाॅल क्लिनिक रुग्णालयात रेडियाेलाॅजिस्ट म्हणून शिक्षण घेण्यास आला हाेता. परंतु कामाच्या अतिताणामुळे त्याने रुबी रुग्णालयापासून जवळच असलेल्या ढाेले पाटील चाैकातील दामाेदर भवन या वसतिगृहातील आपल्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. रुग्णालयातील कामाच्या अतिताणामुळे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पाेलिसांनी डाॅ. श्याम व्हाेरा याच्या कुटुंबियास माहिती दिली. पीडित कुटुंब गुजरात मधील भावनगर येथून साेमवारी पुण्यात दाखल झाले. त्यानंत पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. पोलिसांच्या माहितीनुसार, डाॅ.शाम व्हाेरा हा रुबी रुग्णालयात निवासी डाॅक्टर म्हणून काम करत हाेता. रुबी रुग्णालयाचे वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात ताे अन्य एका डाॅक्टर साेबत राहत हाेता. रविवारी रात्री ताे रुममध्ये एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पाेलिसांना प्राप्त झाली आहे. त्यात कागदावर त्याने आपल्या माेबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला होता. मृताने कुणावरही आरोप केले नसल्यामुळे त्याच्या आत्महत्या मागील गूढ वाढले आहे. दरम्यान, याप्रकरणी काेरेगाव पार्क पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. मयत डॉक्टरयाच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणती अद्याप तक्रार पोलिसांकडे दाखल केली नाही. काेरेगाव पार्क पाेलिस पुढील चाैकशी करत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे.