
पुण्यात आणखी एक हुंडाबळी प्रकरण:लग्नानंतर सासरच्यांकडून छळ, तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण राज्यभरात गाजलेले असतानाच, आता अशाच पध्दतीने आणखी एक घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार वाघाेली परिसरात केसनंद रस्त्यावर तळेरानवाडी येथे उघडकीस आला आहे. लग्नात हुंडयात पाच लाख रुपये व सात ताेळे साेने न दिल्याने विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याने तिने राहते घराचे दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. स्वाती सरेंद्र पाठक (वय- २०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्वातीच पती सुरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय- २६), सासू सुनिता राजेंद्रप्रसाद पाठक (४५), दिर निरज राजेंद्रप्रसाद पाठक (२३), मामा अरुण ऊर्फ अंकु रमेश उपाध्याय (४५,रा. लाेहगाव, पुणे), मामा अरविंद रमेश उपाध्याय (४०,रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत वाघाेली पाेलिस स्टेशन मध्ये आराेपी विराेधात मयताची आई पुनम पांडे (वय- ५३, रा. सहादप पुरा, जि. महू, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांची मुलगी स्वाती हिचा सुरज पाठक साेबत ६/३/२०२४ राेजी विवाह झाला हाेता. लग्नाचे वेळी सासरच्या व्यक्तींनी लग्नात पाच लाख व साेन्याचे दागिन्याची मागणी केली. परंतु लग्नात स्वातीच्या कुटुंबियांनी एक लाख व सात ताेळे हुंडा मागणीप्रमाणे दिला. परंतु याेग्य हुंडा न दिल्याने स्वातीला सासरच्या व्यक्तींनी त्रास देणे सुरु केले. हुंडा न दिल्याचे रागातून तिचा सासरच्या व्यक्तींनी मारहाण करुन तिला शारिरिक व मानसिक त्रास देणे सुरु केले. तसेच तिच्या अंगावरील साेन्याचे दागिने तिचा पती व सासु यांनी मुथूट फायनान्स मध्ये गहाण ठेऊन त्यावर पैसे घेतले. संबंधित साेने साेडविण्यासाठी स्वाती हिचेकडे तीन ते चार लाख रुपयांची मागणी करुन, तीन लाख रुपये राेख स्वरुपात स्विकारले. तसेच स्वाती हिला घरगुती वेगवेगळया कारणास्तव वादविवाद करुन तिचा शारिरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून स्वाती हिने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहते घराचे दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती, सासु, दीर, मामा यांचे विराेधात पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८०, ११५ (२), ३ (५), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहे.