News Image

पुण्यात १३ जूनला ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम


महाराष्ट्रामध्ये सुमारे एक कोटी आणि पुण्यामध्ये नऊ लाख संख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य समस्या आहेत. ज्येष्ठांच्या या समस्या संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कर्वे समाज शिक्षण संस्था व फेस्कॉम यांच्या समन्वयाने शुक्रवार दिनांक १३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० या वेळेत बालगंधर्व रंगमंदीर पुणे येथे ज्येष्ठांचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या विनामूल्य महामेळाव्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन, पुणेचे प्रमुख विश्वस्त सुधीर मांडके, ॲस्कॉप संघटना, पुणेचे अध्यक्ष दिलीप पवार आणि फेस्कॉमचे अरूण रोडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, पुणेचे अध्यक्ष बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्था, पुणेचे संचालक डॉ. महेश ठाकुर आणि ॲस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवलकर आदी उपस्थित होते. या राज्यस्तरीय महामेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार भूषविणार असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पुण्यातील ज्येष्ठांच्या समस्यांबाबत संयोजकांतर्फे एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्या अभ्यासातून प्रतीबिंबीत झालेल्या सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांचा अभ्यास करुन त्याची मांडणी या महामेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या समस्यांबाबत देखील निवेदन करण्यात येणार आहे. यावेळी फेस्कॉम संघटनेतर्फे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर प्रकाश झोत टाकण्यात येणार आहे. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ व ॲस्कॉप यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अहवाल कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केला असून तो यावेळी मांडण्यात येणार आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.