
पुण्यात पिस्तूल रोखणारा सराईत अटकेत:विश्रांतवाडी पोलिसांनी इटालियन बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस केले जप्त
विश्रांतवाडी पोलिसांनी भर चौकात पिस्तूल रोखणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून इटालियन बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. आरोपीची ओळख तौफिक उर्फ रकीब रफीक शेख (वय ३२) अशी असून तो श्रमिक वसाहत, येरवडा येथील रहिवासी आहे. ४ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास टिंगरेनगर भागात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात शेखने पिस्तूल काढून रोखल्याची माहिती नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यावेळी सदर दोघांमध्ये वाद सुरूच होते आणि ते विकोपाला जात होते .त्याचवेळी 'कॉप्स २४' योजनेअंतर्गत गस्त घालणारे पोलिसआणि विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील ५० हजार रुपयांचे इटालियन बनावटीचे पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन शेखला पकडल्याने अनर्थ टळला. शेख याच्याकडे शस्त्र परवाना नाही. त्याने परदेशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले ? यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने पिस्तूल चोरल्याचा संशय आहे. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव आणि सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, तसेच गस्त घालणारे पोलिस कर्मचारी लंघे आणि माळी यांनी ही कामगिरी केली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत पाठवले आहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहे.