
भाडेवाढ न करता सर्व लोकल AC करणार:देवेंद्र फडणवीस म्हणाले-राहुल गांधींच्या प्रश्नांची पुराव्यासह उत्तरे दिली, रोज खोटे बोला हीच त्यांची नीती
राहुल गांधी यांच्या प्रत्येक प्रश्नाचे पुराव्यासहित उत्तर दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही. तर त्यासाठी आमचा कार्यकर्ता देखील पुरेसा असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर अनेक प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. रोज खोटे बोला, हीच राहुल गांधी यांची नीती आहे. यामुळे लोकांच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. राहुल गांधी यांना त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे उत्तर दिलेले आहे. त्यावर ते एकही उत्तर देऊ शकले नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित असतो. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने एकही आक्षेप नोंदवण्यात आलेला नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या सेलने याआधी देखील माहितीच्या अधिकारात त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मागितली आहेत. या माध्यमातून निवडणूक आयोगाने देखील काँग्रेस पक्षाचे तोंड बंद केले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाडेवाढ न करता मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याचा विचार मुंब्रा येथे घडलेली कालची घटना अतिशय गंभीर आहे. काही माध्यमांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी कालच माझ्याशी पाऊण तास चर्चा केली आहे. यातल्या अडचणी आणि उपाययोजना त्यांनी मला सांगितल्या आहेत. यावर उपाय करण्यासाठी सर्व लोकल या भाडेवाढ न करता एसी करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 'सेवा आणि सुशासनाचे अकरा वर्षे' या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन 'सेवा आणि सुशासनाचे अकरा वर्षे' या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत विकसित भारत ही अकरा वर्षातील मोदी सरकारची कामगिरी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्र प्रथम अशा प्रकारच्या भूमिकेतून नरेंद्र मोदी सरकारने काम केले आहे. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचे ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासात लिहिले जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदी सरकारने 10 पट जास्त निधी दिला यूपीए आणि एनडीएच्या सरकारमधील दहा वर्षांच्या सत्ता काळात महाराष्ट्राला मिळालेल्या निधीची आकडेवारी देखील फडणवीस यांनी जाहीर केली. 2004 ते 2014 या कालावधीमध्ये एकूण आपल्याला यूपीए सरकार कडून एक लाख 23 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. तर त्या नंतरच्या दहा वर्षांच्या एनडीएच्या सरकारकडून दहा लाख पन्नास हजार कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच एक लाख आणि दहा लाख यातला फरक लक्षात घेतला तर दहा पट जास्त पैसे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत, असा असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.