News Image

शरद पवार गटाच्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश:शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंचे वाढले टेंशन, स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत मोठे आव्हान


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन पुण्यात साजरा करण्यात आला. तिकडे वर्धापनदिन साजरा होत असतानाच शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. सातारा येथील पाटण तालुक्यातील शरद पवार गटाचे सत्यजित सिंह पाटणकर आणि कॉंग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार गटाचा नेता भाजपमध्ये गेला असला तरी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी ही अडचण असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच पार पडतील. त्यासाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे. साताऱ्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असला तरी आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत पाटणकरांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश शंभूराज देसाई यांना एक मोठे आव्हान असणार आहे. महायुतीत भाजप आणि शिवसेनेत पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाषण केले. ते म्हणाले, साताऱ्यातून भाजपमध्ये हाडामासाचा पदाधिकारी सहभागी होत आहे, याचा आनंद आहे. सरकारच्या योजनेत प्रामाणिकपणे राबवणारा हा पक्ष आहे. आपण ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच आपले भवितव्य ठरवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सत्यजित पाटणकर यांनी म्हटले आहे. निवडणुका तोंडावर आहेत, वेळ कमी आहे. शेतकरी कामात व्यस्त असतात. गावागावात जाऊन पक्षाचे काम करायचे आहे, असेही पाटणकर म्हणाले.