
तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात:पुन्हा काही बोललात, तर उलट्या करायला लावीन; प्रकाश महाजनांना नारायण राणेंचा इशारा
प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. पुन्हा काही बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला दिला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती, त्यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलन केले. त्यानंतर नारायण राणे यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे. नारायण राणे यांना प्रकाश महाजन यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ते कोण? मी फक्त स्वर्गीय प्रमोद महाजन यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना ओळखतो. मी बाकी चिरीमिरींना ओळखत नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही, त्यांना माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळत असेल तर मी त्यांना संधी देणार नाही. त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचे नाही. एकटा भेट मग सांगतो पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन. दम असेल तर येऊ दे, दोन्ही एकत्र येऊ द्या. प्रकाश महाजनला मी कधी भेटलोही नाही, त्याला उलट्याचा अर्थ कळत नाही. एकटा भेट मग सांगतो, असे म्हणत इशारा दिला आहे. तसेच आम्ही त्यांना कशाला मारू, कशाला कोणी 302 अंगावर घेईल, तो काही गिणतीत आहे का? तुम्हाला कोण विचारत नाही, कोणी काही देत नाही म्हणून हे सगळे सुरू आहे. कोणी आत्महत्या करायची धमकी देत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, बाजारात बॉटल किती रुपयांना मिळते माहीत नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी डिवचले आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, नीलेश आणि नितेश यांना निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या दीड दमडीच्या माणसाकडून तर नाहीच. प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे. मी राज ठाकरे यांचा खरा कार्यकर्ता आहे, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत. नारायण राणे - प्रकाश महाजन यांच्या वादा नंतर प्रकाश महाजन यांना धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली अर्धा तास आंदोलन केले. मी इथे उभा आहे किंवा कुठे यायचे मला सांगा, मी यायला तयार असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.