
फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले- रोहित पवार:ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे - अमोल कोल्हेंचे वर्धापनदिनी जोरदार भाषण
रोहित पवार म्हणाले, संस्थापक तेच, उलट नावाचा झाला विस्तार, चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे निःस्वार्थी कार्यकर्ते. अशा काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. गेल्या 26 वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं, फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले, वादळ आलं आणि दुष्काळही पाहिला पण वटवृक्षाचं खोड आजही अविचलतपणे घट्ट उभं आहे म्हणजे शरद पवार साहेब. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब झाले पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, सत्तेची छाया आणि विरोधातले चटके दोन्ही आपण सर्वांनी पहिले आहे. पण सामन्यांची सेवा हा पक्षाचा मूळ स्वभाव हा कधी बदललेला नाही, सामान्य माणसाशी जोडलेली भावनिक नाळ कधीही आपली तुटलेली नाही, संकटात धावून जाण्याचा धर्म कधीही सोडलेला नाही कारण तो आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे. सत्ता आली काय आणि सत्ता गेली काय, सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब झाले. पण आपलं घर बांधण्यासाठी कण कण माती बाहेर काढणाऱ्या मुंगीप्रमाणे अविरत कष्ट करणारे कार्यकर्ते हा मात्र पवार साहेबांसोबत आणि पक्षासोबत आजही आपल्या बरोबर आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे हा पक्ष कोणामुळे आहे, तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर हे सर्व नेते किती काहीही झाले तरी पवार साहेबांच्या सोबत राहिले म्हणून हा पक्ष आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर राज्यातल्या सामान्य कुटुंबाटले जे पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे. हा पक्ष कोणामुळे आहे, तर सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे, हा पक्ष कोणामुळे आहे तर या पक्षावर, पवार साहेबांवर विश्वास ठेवणारे राज्यातील सामान्य नांगरिकांमुळे आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले. पुढे रोहित पवार म्हणाले, जाता जाता मी एवढीच विनंती करतो, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रिया ताई असतील, आव्हाड साहेब असतील टोपे असतील, भूषणजी राजे होळकर असतील, सगळेच मोठे नेते. आज कदाचित त्यांना मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील, पण विचारांसाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते पवार साहेबांसोबत राहिले त्यासाठी या सगळ्यांचे जोरदार टाळ्या वाजवत सत्कार केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी या सगळ्या नेत्यांचा सत्कार केला. घरगुती कार्यक्रमाला शक्तिप्रदर्शन करायचं नसतं रोहित पवार म्हणाले, काही लोक म्हणतात सत्ता नाही तर आता करायचं काय? मी एवढंच सांगेल की आपण पवार साहेबांकडून काय शिकलो तर संघर्ष करायला शिकलो आहोत. पवार साहेब हे सत्तेत राहिले पण 20-22 वर्ष ते विरोधात सुद्धा राहिले. लोकांना काय पाहिजे ते लोकांमध्ये जाऊन समजून घेतले आणि जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं. आज ठीक आहे सत्ता नाही, पण लढू तर शकतो, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार याच्यातून आपण काय शिकलो आहोत तर संघर्ष शिकलो आहोत, निष्ठा शिकलो आहोत. कितीही संकट आले तरी लढायचं कसं हे आपण या महामानवांकडून शिकलो आहोत. पवार साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही या राज्यातले नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी लढायला तयार आहोत. तिकडे दुसरीकडे शक्तिप्रदर्शन सुरू आहे म्हणतात, परंतु घरगुती कार्यक्रमाला शक्तिप्रदर्शन करायचं नसतं, असं म्हणत अजित पवारांच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे - अमोल कोल्हे अमोल कोल्हे म्हणाले, फार सुंदर ओळ दिली आहे 'ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे. त्यामुळे योगायोग बघा आपण परभाव झाला सत्ता कधी येणार, सत्तेचं काय, आपण ही सगळी समिकरणं मांडत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं काय, ज्या समाजाचं प्रतिनिधी आपण करतो, त्या समाजकारणाचं काय याचा विचार आपण कधी करतो? म्हणजे योगायोग बघा आज 10 जून आहे, मागे 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा केला आणि आता आणखी आठ दिवसांनी माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. आणि या दोन तारखांचा जर योगायोग बघितला तर पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात जो वैष्णवांचा मेळा जमणार आहे, तिथे अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत. जेव्हा समाजात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना अठरा पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं हे अशा देवाच्या समोर लीन होणं की 33 कोटी देव आहेत, प्रत्येक देवाच्या हाती शस्त्र आहे. पण एकच पांडूरंग आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याचे हात कमरेवर आहेत, पण सगळं जग त्याच्या समोर लीन होतं हा प्रेमाचा संदेश आपण कधी देणार आहोत? पुढे अमोल कोल्हे म्हणाले, जेव्हा सत्तेच्याबाबतीत कोणी प्रश्न विचारतो तेव्हा आवर्जून सांगा निवडणूक केवळ माध्यम असतं, सत्ता हे साध्या नाही, सत्ता हे केवळ साधन असतं आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं आणि हे लोकांचं कल्याण 55 वर्ष अविरतपणे करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना गरज आहे.