आखाडा बाळापूर येथील व्यक्तीचा खून:पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पाच संशयितांची गुन्हे शाखेकडून चौकशी
Category: Maharashtra |
02 Dec 2025
आखाडा बाळापूर येथील एका व्यक्तीचा रामेश्वरतांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारातील खून प्रकरणात अनोळखी व्यक्ती विरुध्द सोमवारी ता. १ रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच संशयीतांची चौकशी केली असून त्यातून आता खून प्रकरणाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरतांडा ते कोपरवाडी मार्गावर कोपरवाडी शिवारात एका व्यक्तीचा मृतेदह सोमवारी ता. १ सकाळी आढळून आला. आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारीत केले होते. त्यानंतर सदर मृतदेह पंजाब मोरे (५८ रा. आखाडा बाळापूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाचे हात रुमालाने बांधलेले होेते तर त्यांच्या चेहऱ्यावर जखमाही आढळून आल्या. तर उत्तरीय तपासणीमध्येही त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी नितीन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ रात्री उशीरा अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाला रवाना केले. या पथकाने पाच जणांची चौकशी केली आहे. दरम्यान, मयत पंजाब मोरे हे आखाडा बाळापूर येथून कोपरवाडी शिवारात कसे गेले, त्यांच्या सोबत कोण होते याची माहिती घेतली जात असून आखाडा बाळापूर शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्यावरून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात महत्वाचे धागेेदोरे हाती लागतील असा दावा पोलिसांनी केला आहे.
Source: DivyaMarathi