CID ची VSR च्या मालकाला VIP ट्रिटमेंट:रोहित पवार यांचा गंभीर आरोप; 8 तासांच्या चौकशीचा फार्स करत शाही बडदास्त ठेवल्याचा दावा
CID ची VSR च्या मालकाला VIP ट्रिटमेंट:रोहित पवार यांचा गंभीर आरोप; 8 तासांच्या चौकशीचा फार्स करत शाही बडदास्त ठेवल्याचा दावा
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांचेग त 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरून या अपघाताला कथितपणे व्हीएसआर कंपनीचा अनागोंदी कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या कंपनीचे मालक व्ही के सिंग यांच्या चौकशीचीही मागणी केली आहे. त्यानुसार, सीआयडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले असता रोहित पवार यांनी व्ही के सिंग यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप केला आहे. व्ही के सिंगला चौकशीसाठी बोलावले होते की शाही पाहुणचारासाठी? रोहित पवार शुक्रवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का? असा सवाल रोहित पवार यांनी यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. रोहित पवार आज सीआयडीच्या कार्यालयात जाणार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास अद्याप वेळ मिळाला नसल्याचा दावा करत आज दुपारी 4 वा. सीआयडी कार्यालयात जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर FIR करु असं आश्वासन देणाऱ्या CID ला चार-पाच दिवस उलटले तरी FIR करायला वेळ मिळालेला नाही. म्हणूनच आज (शुक्रवार) दुपारी 4 वाजता CID कार्यालयात जाणार आहे आणि यावेळी माझ्याकडं नव्याने आलेली अधिक माहितीही त्यांच्याकडं सोपवणार आहे, असे ते म्हणालेत.