देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची तुटली:बिहार विधानसभेच्या प्रचारात घडला प्रसंग; LJP चे चिराग पासवानही पडता पडता वाचले
Maharashtra | 04 Nov 2025, 10:50 | Source: DivyaMarathi
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या प्रचारादरम्यान एनडीएच्या एका जाहीर सभेत मोठा अनपेक्षित प्रसंग घडला. खगरिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर खुर्चीवर बसत असतानाच खुर्ची अचानक तुटली आणि दोघेही पडता पडता थोडक्यात वाचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने फडणवीस आणि पासवान यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सुरक्षारक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही मिनिटांत कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. फडणवीस यांनीही ही घटना हलक्याफुलक्या अंदाजात घेत प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन केले आणि म्हणाले, “सर्व काही ठीक आहे, आता कामाला लागूया!” नेमके काय घडले? एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ रविवारी ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस आणि पासवान व्यासपीठावर पोहोचले. ते आपल्या नियोजित खुर्च्यांवर बसत असतानाच, खुर्चीची पाय अचानक तुटला आणि फडणवीस संतुलन गमावून खाली पडले. या घटनेमुळे व्यासपीठावर क्षणभर हशा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आयोजकांनी तात्काळ नवीन खुर्च्या आणल्या आणि सभा पुन्हा सुरू करण्यात आली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. फडणवीसांचा महागठबंधनवर हल्लाबोल या घटनेनंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "बिहारची जनता आता विकासाची अपेक्षा करते, आणि एनडीएच ती दिशा देऊ शकते. महागठबंधनने गेल्या काळात फक्त भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली," असे ते म्हणाले. तर, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी महागठबंधनला 'सत्तेसाठी तयार केलेली संधीसाधू आघाडी' म्हणून हिणवले. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस खुर्ची तुटल्याचा हा व्हिडिओ कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक युझर्सनी या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर करून मजेदार मीम्स तयार केले आहेत. BJP Leader Funny Incident अशा हॅशटॅगसह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयोजकांच्या मंच व्यवस्थेतील निष्काळजीपणावर अनेक युझर्सनी टीका केली.