EC त सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही:ठाकरे गटाची EC च्या आजच्या PC वर टीका; वर अन् खाली फेकेंद्र म्हणत भाजपवर निशाणा

Maharashtra | 04 Nov 2025, 11:38 | Source: DivyaMarathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका करत आयोग विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. मतचोरीतून अस्तित्वात आलेल्या सरकारच्या वळचणीला गेलेला निवडणूक आयोग विरोधकांच्या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण न देता आज तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देशात व राज्यात वर नरेंद्र अन् खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही. वरही फेकेंद्र अन् खालीही फेकेंद्र अशी स्थिती आहे, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वा. पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचे गाडीभर पुरावे दिलेत. मतदारयाद्या व त्यात होणारी मॉलप्रॅक्टीस, दुबार मतदान, डिलिशन, अॅडिशन आणि कशा प्रकारे एकाच कुटुंबात शेख, कांबळे व जैन अशी विविध नावे येणे हे अतिशय भयंकर आहे. यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता, त्यावर काहीही भाष्य न करता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणे व आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत असे म्हणणे हे वास्तवापासून पळ काढणे आहे. सत्यापासून तोंड लपवणे आहे. निवडणूक आयोगात सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही त्या म्हणाल्या, निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही. निवडणूक आयोग काँग्रेस नेते राहुल गांधी, आमचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या गाडीभर पुराव्यांवर चकार शब्दाने बोलू इच्छित नाही. याचे दोनच अर्थ होतात. एक यांनी सत्य मान्य केले आहे आणि दुसरे यांच्याकडे दुसरे कोणतेही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असे काही नाही. त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की, विधानसभा निवडणुकीतून निर्माण झालेले सरकार हे मतचोरीतून निर्माण झाले आहे. त्यामुळे हे चोर सरकार आहे. अशा सरकारच्या वळचणीला गेलेला निवडणूक आयोग कुठलीही शहानिशा न करता व विरोधकांच्या आरोपांना स्पष्टीकरण न देता आज तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करत आहे. भाजपचा स्वायत्त यंत्रणांना धरून रडीचा डाव सुरू सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, महाविकास आघाडीस सर्वच पक्ष सांगत आहेत की, तुम्ही 7 वर्षे निवडणुका लांबवल्या. तुमच्या सोयीने एकेक महिना तुम्ही काढला. तुमच्या सोयीने तुम्ही एकेक वर्ष लांबवले. जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्षे निवडणुका लांबवल्या, तिथे अजूनही दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो? निवडणूक याद्या साफ करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली. तरीसुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजप स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे. भाजपचे वारे किंवा लाटही नाही राज्यात भाजपचे वारे, भाजपची लाट नाही. वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही. वरही फेकेंद्र व खालीही फेकेंद्र असेच सगळे चित्र आहे. परंतु, अशा स्थितीतही निव्वळ दंडेलशाही व दडपशाही करणे हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. पण तरीही आज निवडणूक आयोगाने जे पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे, यावर नेमकी भूमिका काय घ्यायची यासंबंधाने आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत जाहीर करू, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. विरोधकांच्या परवाच्या मोर्चाचा निवडणूक आयोगाने धसका घेतला आहे. हे उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नाही. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग पळ काढण्याची भूमिका घेत आहे, असेही सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या. हे ही वाचा... राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे 'चित्र' स्पष्ट होणार, आचारसंहिता लागणार? मुंबई - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केवळ तारखांची घोषणाच नव्हे, तर आरक्षणासंदर्भातील अंतिम स्थिती किंवा निवडणुकीच्या तयारीतील अन्य प्रशासकीय टप्प्यांबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. वाचा सविस्तर