एक वेळी आई मेली तरी चालेल…:टीकेची झोड उठल्यानंतर शिंदेंच्या आमदाराकडून हात जोडून माफी, म्हणाले - अनावधानाने शब्द बाहेर पडला

Maharashtra | 04 Nov 2025, 10:17 | Source: DivyaMarathi

मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापले असताना, मागाठाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ झाला. 'मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे,' असे विधान त्यांनी केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. मात्र, जोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर, सुर्वे यांनी तातडीने हात जोडून माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी माझी आई, आणि उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, असे विधान केले होते. टीकेची झोड उठल्यानंतर प्रकाश सुर्वे यांनी माफी मागत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नेमके काय म्हणाले प्रकाश सुर्वे? वाद चिघळताच सुर्वे यांनी आपल्या शब्दांची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली. मराठी माझी मायमावली आहे. अनावधनाने माझ्याकडून तो शब्द बाहेर पडल्याची सरावासारव त्यांनी केली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत सर्वे यांनी हात जोडून माफी मागितली. प्रकाश सुर्वेंचे वक्तव्य काय? मनसेकडून सुर्वेंचा निषेध मनसे नेते नयन कदम यांनी प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? "मराठी मेली तरी चालेल" स्वतःच्या आईला मारून यूपीची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध, असे म्हणत नयन कदम यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. आई आणि माता यातील फरक तरी कळतो का? प्रकाश सुर्वे यांनी मतांच्या लाचारीसाठी असे वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधला. "2022 मध्ये आईलाच (मूळ शिवसेनेला) नमस्कार करून ते बाहेर पडले. त्यांना आई आणि माता यातील फरक तरी कळतो का?" असा संतप्त सवाल पेडणेकर यांनी केला. मंत्री सामंतांकडून बाजू सांभाळण्याचा प्रयत्न या संपूर्ण वादावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पडद्यामागून सुर्वे यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. मंत्री सामंत म्हणाले की, आमदार सुर्वे यांच्याकडून चुकून हा शब्द बाहेर पडला असून, त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, काही लोक त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी भाषेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी काम करत आहोत," असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.