हनी ट्रॅप:मोबाइलवरून अश्लील संदेश, फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; कोल्हापूरच्या नेत्यासोबत धक्कादायक प्रकार

Maharashtra | 10 Oct 2025, 11:27 | Source: DivyaMarathi

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे हनी ट्रॅप रॅकेटच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेने मोबाइलवरून आमदार पाटील यांना अश्लील संदेश आणि फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अनोळखी महिलेने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू झाला. हळूहळू ती महिला अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिने काही तरुणींचे अश्लील फोटो आणि संदेश पाठवणे सुरू केले. काही दिवसांनंतर तिने आमदार पाटील यांच्याकडून पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला एक लाख, नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम मागण्यात आली. एकूण दहा लाख रुपये द्यावे, नाहीतर फोटो आणि चॅट सोशल मीडियावर टाकून प्रतिमा मलिन करू, अशी धमकी महिलेने दिल्याचे समोर आले आहे. शिवाजी पाटील यांनी काही काळ त्या महिलेच्या संदेशांकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी तिला ब्लॉक केले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाइल नंबरवरून पुन्हा संपर्क साधला. यावेळी तिने आणखी अश्लील संदेश आणि फोटो पाठवत पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तुमची प्रतिमा बिघडवेन, अशी धमकी दिली. सतत वाढत जाणारा हा त्रास आणि ब्लॅकमेलिंगच्या धमक्या पाहता अखेर आमदार पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऑनलाईन हनी ट्रॅप रॅकेट्सविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन प्राथमिक तपासात हा सायबर हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिस तांत्रिक तपासाद्वारे तिचा लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी अनेक मोबाइल नंबर आणि सोशल मीडिया अकाउंटचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन हनी ट्रॅप रॅकेट्सविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आमदार पाटील यांनी सांगितले की, हे सर्व नियोजितपणे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी केले जात आहे. मात्र मी कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हनी ट्रॅप रॅकेट्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की सायबर गुन्हे आणि हनी ट्रॅप रॅकेट्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यात राजकीय तसेच सामाजिक स्तरावरील लोकांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.