हिंगोली, कळमनुरीत EVM बदलले:नगरपालिका मतदानासाठी सकाळपासून गर्दी; पोलिसांचा चोख बंदोबस्त
हिंगोली, कळमनुरीत EVM बदलले:नगरपालिका मतदानासाठी सकाळपासून गर्दी; पोलिसांचा चोख बंदोबस्त
हिंगोली व कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी ता. २ सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. दुपारी दिड वाजेपर्यंत हिंगोलीत ३६.६८ टक्के तर कळमनुरीत ३९.७२ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, हिंगोलीत मतदाराला निवडूक चिन्ह सांगून मतदानाची गोपनियता भंग केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली नगर पालिकेच्या ३४ तर कळमनुरी नगर पालिकेच्या २० जागांसाठी मतदान घेतले जात आहे. हिंगोलीत ७८ तर कळमनुरीत २८ मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी नागरीकांची गर्दी झाली होती. सकाळी मॉकपोलच्या वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे दिसून आले. यामध्ये हिंगोली शहरातील गणेशवाडी मतदान केंद्रावर मशीनचे बटन दबत नसल्याने मतदान यंत्र बदलण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी नागरीकांच्या रांगा दिसून आल्या होत्या. या शिवाय कळमनुरी येथे पाच ठिकाणी मशीन बदलण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार व समर्थकांची कडाक्याच्या थंडीतही गर्दी झाली होती. दोन्ही ठिकाणी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दल तैनात करण्यात आले आहे. या शिवाय जिल्हयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर तैनात केले आहेत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनीही सर्व मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरवात केली आहे. या शिवाय कुठेही अनुचीत प्रकार करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, हिंगोली येथील एका मतदान केंद्रावर शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महिला मतदारास मतदान चिन्ह सांगून गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.