जयंत पाटील भाजपत आले तरी पडळकरच सीनियर राहतील:ज्युनियर म्हणून मागे बसतील, चंद्रकांत पाटील यांनी घेतली पडळकरांची बाजू
जयंत पाटील भाजपत आले तरी पडळकरच सीनियर राहतील:ज्युनियर म्हणून मागे बसतील, चंद्रकांत पाटील यांनी घेतली पडळकरांची बाजू
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत आयोजित सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना उघडपणे टोले मारत मोठे वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आधीच जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर टीका केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून वक्तव्य केले. पाटील यांनी सांगितले की, जर जयंत पाटील भाजपत आले तर सांगली जिल्ह्यात पडळकरच सीनियर राहतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागे बसतील. तसेच पडळकरांच्या समर्थनार्थ जयंत पाटीलांना घोषणाबाजी करावी लागेल. पाटील यांनी आपल्या भाषणात पाच वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या चौकशीची जबाबदारी घेतली पाहिजे असे ठरवण्याचा इशारा देत म्हटले की, आम्ही रावण जाळून या विकृतीचा नाश करीत आहोत; उद्यापासून सांगली जिल्ह्यात शांतता पाहिजे. पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. त्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्यापासून ते लॉटरी ऑनलाईन घोटाळा व सर्वोदय कारखान्याच्या ताब्यापर्यंत पाच प्रकरणे उघड करण्याचा इशारा दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु केली तर काहीजणांना आपल्या गावातून पळून जावं लागतील, कारण त्यांना जेलची भीती वाटेल. राजकीय चर्चेतून पाटील यांनी आक्रमक भाषण करत प्रत्यक्ष नाव न घेता विरोधकांवर तीव्र आरोप केलेत. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जयंतरावांचा फोन आला; मी जाहीरपणे बोलतो, मी कोणाला घाबरत नाही. पडळकरांनी कालच केली होती विखारी टीका जतमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच समज दिल्यानंतरही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? असा सवाल करत त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिले होते. जातीवंत पाटील असाल तर वेळ, तारीख आणि ठिकाण सांगा, मी तिथे हजर राहतो, असेही पडळकर म्हणाले होते. या भाषणात पडळकरांनी आक्षेपार्ह भाषा वापरत जयंत पाटलांसोबतच त्यांच्या निकटवर्तीय दिलीप पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी; सदाभाऊ खोत यांचाही हल्लाबोल भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली. राजारामबापू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली, पण जयंत पाटील यांनी तीच माणसे उभी केलेल्यांचे साखर कारखाने घ्यायला सुरुवात केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणले. त्यांनी संभाजी पवार यांचा कारखाना हाणला, त्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत खोत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. खंडे नवमीच्या निमित्ताने बोलताना खोत म्हणाले, खंडे नवमीला हत्यारांचे पूजन होते, आता ही हत्यारे आम्ही हातात घेणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.