ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे 85 व्या वर्षी निधन:मराठी चित्रपटसृष्टीतील 'खाष्ट सासू' काळाच्या पडद्याआड, खलनायकी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात
Entertainment | 03 Nov 2025, 19:13 | Source: DivyaMarathi
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'खाष्ट सासू' आणि खलनायकी चेहरा म्हणून त्यांची विशेष ओळख होती. पडद्यावर त्या साकारत असलेल्या या भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. त्यांची आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. 11 मार्च 1940 रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांनी 1990 नंतर चित्रपटसृष्टीतील काम थांबवले होते. खरे तर, दया डोंगरे यांची गायन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शालेय जीवनापासूनच शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत याचे औपचारिक प्रशिक्षण घेतले होते. मात्र, कालांतराने त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या आणि त्यांनी रुपेरी पडद्यावर आपल्या खलनायकी भूमिकांनी ठसा उमटवला. वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेत, मराठी कलाविश्वातील ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. दया डोंगरे यांना बनायचे होते गायिका दया डोंगरे यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गाणे सादर केले होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला, जिथे त्या पुरुषोत्तम करंडक आणि एकांकिका स्पर्धांमधून अभिनय करत होत्या आणि याच काळात त्यांना अभिनयाची गोडी लागली. अभिनयात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. या दरम्यान, त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले, ज्यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला नेहमी पाठिंबा दिला. या चित्रपटांतून दया डोंगरेंनी सोडली अभिनयाची छाप दया डोंगरे यांनी 'आव्हान', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'खट्याळ सासू नाठाळ सून' यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांनी विशेषतः खलनायिकेच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर साकारल्या, ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ललिता पवार यांच्यानंतर खल भूमिका करणारी दुसरी महत्त्वाची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख बनली. मराठीबरोबरच त्यांनी 'आश्रय', 'जुंबिश', 'नामचीन' आणि 'दौलत की जंग' अशा हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला. त्यांनी 1990 नंतर अभिनय करणे थांबवले, परंतु त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानासाठी 2019 मध्ये नाट्य परिषदेतर्फे त्यांना 'जीवन गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते.