मुदत संपल्यानंतरही पाहणी फक्त 64% पूर्ण:शेतकऱ्यांचा नोंदणीकडे कानाडोळा; नोंदणी न केलेले लाभाला मुकणार
Category: Maharashtra |
04 Oct 2025
ई-पीक पाहणीची नोंद करण्याची मुदत संपली असून, सध्या ६४.६८ टक्के पाहणी झाली आहे. विविध भागात सुरू असलेला मुसळधार पाऊस, सर्व्हर डाऊनचा परिणाम ई-पीक पाहणीवर झाल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तीची स्थिती व शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पीकपेरा नोंदणीला पुन्हा मुदतवाढ मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी अनुदान, पिक विमा, नुकसान भरपाई यासह कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपद्वारे खरीपातील पिकांची नोंद करून घेणे गरजेचे होते. परंतु या मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्याने शासनाने पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत पाहणी करणे बंधनकारक केले होते. १३ सप्टेंबरपर्यंत २२ लाख २७ हजार ५५४ हेक्टरवर ई-पीक पाहणी पूर्ण झाली होती. त्याची टक्केवारी ४७.३२ होती. मात्र त्यानंतरही ई-पीक पाहणीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. परिणामी शासनाने ई-पीक नोंदणीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ६४.६८ टक्के पाहणी झाली. असे झाले तीन महिन्यात नुकसान : जिल्ह्यात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. चार तालुक्यातील १६३ गावांमधील ७ हजार ५७७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ५ लाख ५६ नुकसान झाले होते. ही मदत मंजूर होऊन बाधित शेतकऱ्यांना वितरीत होणे सुरू आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका ११ हजार ५९७ शेतकऱ्यांना बसला होता . ११ हजार ५९७ शेतकऱ्यांचे ६ कोटी २१ लाखांचे नुकसान झाले होते. ही मदत २३ सप्टेंबर रोजी मंजूर झाली. ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला आहे. भरपाईसाठी ९२ कोटींची आवश्यकता आहे. तालुका टक्केवारी अकोट ६०.४२ अकोला ६०.६२ तेल्हारा ६७.१६ पातूर ६७.०३ बार्शीटाकळी ६५.१६ बाळापूर ६५.६० मूर्तिजापूर ७१.१० एकूण (सरासरी) ६४.६८ ...यासाठी नोंदणी करणे आवश्यक राज्य शासनाकडून २०२१ पासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतातील पिकांचा पेरा ऑनलाईन पद्धतीने सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर ई-पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना पीकविमा आणि पीक कर्जापासून वंचित राहावे लागते.