नवरात्रीच्या नऊ रंगांत अश्विनी महांगडेचे अनोखे फोटोशूट:प्रेरणादायी कर्तृत्ववान स्त्रियांचे केले रूप धारण, पाहा PHOTO
नवरात्रीच्या नऊ रंगांत अश्विनी महांगडेचे अनोखे फोटोशूट:प्रेरणादायी कर्तृत्ववान स्त्रियांचे केले रूप धारण, पाहा PHOTO
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्रीशक्तीची आराधना आणि शक्तीचा जागर. या उत्सवात आदिशक्तीच्या विविध रूपांना वंदन केले जाते. याच परंपरेला अनुसरून, अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने यंदाच्या नवरात्रीत एक विशेष संकल्पना राबवली आहे. अश्विनीने नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या कर्तबगार व प्रेरणादायी स्त्रियांचे रूप धारण करत खास फोटोशूट केले आहे. समाजात आपल्या कामामुळे मोठे स्थान निर्माण करणाऱ्या आणि स्त्रीशक्तीचे सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या स्त्रियांच्या वेशभूषेतले तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. 1. लता मंगेशकर या फोटोच्या कॅप्शनमध्ये अश्विनी म्हणते, लता मंगेशकर या भारताच्या स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथे झाला. त्यांनी तब्बल सात दशके हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये चार हजारांहून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यांचा आवाज भावपूर्ण, गोड आणि शुद्धतेमुळे जगभरात प्रसिद्ध झाला. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारखे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचा अमर आवाज आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. 2. सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक सुधारक होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांनी त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. जातीभेद, अंधश्रद्धा व महिलांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. १० मार्च १८९७ रोजी लोकसेवेत कार्यरत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला नमन. 3. सिंधुताई सपकाळ : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या “अनाथांची माय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी आयुष्यभर अनाथ, निराधार व समाजात वंचित राहिलेल्या मुलांसाठी आश्रम उभारले व त्यांना आईसारखे प्रेम दिले. 4. चंदाताई तिवडी: भारुडकार चंदाताई तिवडी या प्रसिद्ध भारूडकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लोककलेतून समाजजागृती आणि संस्कृतीचे जतन करण्याचे मोठे कार्य केले आहे. 5. रंजना देशमुख: कलाकार​​​​​​​ रंजना देशमुख या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गाजलेल्या अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म १९५५ मध्ये झाला. १९७० ते १९८० या काळात त्यांनी मुंबईचा फौजदार, चानी , अरे संसार संसार, झुंज, जखमी वाघीण यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रभावी भूमिका केल्या. 6. सुधा मूर्ती : लेखिका, समाजसेविका 7. ताराराणीसाहेब भोसले: वीरांगणा​​​​​​​​​​​​​​ ताराराणीसाहेब भोसले या मराठ्यांच्या इतिहासातील शूर आणि दूरदृष्टी असलेल्या राणी होत्या. त्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी स्वतः राज्यकारभार हाती घेतला. औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांच्या स्वराज्याचा भगवा उंच ठेवण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या. त्यांच्या धैर्याने आणि नेतृत्वाने मराठ्यांचे सामर्थ्य पुन्हा उभे राहिले. 8. संत कन्होपात्रा : संत संत कन्होपात्रा या वारकरी संप्रदायातील भक्तिसंत होत्या. त्यांचा जन्म मंगळवेढा येथे झाला. त्या लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीत तल्लीन होत्या आणि अभंग रचून लोकांना भक्ति व सदाचाराचा संदेश देत असत. समाजातील बंधनांना न जुमानता त्यांनी विठ्ठलाची अखंड सेवा केली. अखेर पंढरपूरच्या विठोबाचरणी मध्यवर्ती मंदिरात त्यांचे निधन झाले . त्या एकमेव अश्या व्यक्ती आहेत ज्यांची समाधी मंदिराच्या परिसरात आहे.