पाटील चालेल पण पटेल नको:राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अध्यक्षपदावर टोला; प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता निशाणा
पाटील चालेल पण पटेल नको:राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अध्यक्षपदावर टोला; प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता निशाणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीच्या वेळी वातावरण भावनिक होते. कार्यकर्त्यांकडून अजित पवार अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या सोहळ्यास उपस्थित होते. या शपथविधीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा, असे मत व्यक्त केले. पाटील चालेल पण पटेल नको, असे म्हणत त्यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसून आले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘विचका’ झाला आहे. अशा परिस्थितीत भाष्य करावेसे वाटत नसले तरी आजच्या घडामोडींवर बोलणे भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठमोळ्या मातीतून उभा राहिलेला पक्ष असल्याने त्याचे नेतृत्वही मराठी व्यक्तीकडेच असावे, असे त्यांनी ठामपणे मांडले. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चर्चांनाही वेगळा आयाम मिळाला आहे. दरम्यान, शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा गटनेतेपदासाठी प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. परिणामी, सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवारांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर येणार असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबतही हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सह्या घेण्याची मोहीमही सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमधून अजित पवारांविषयी असलेली भावना स्पष्ट दिसून आली. शोक आणि राजकीय घडामोडी यांचे मिश्र चित्र लोकभवनात पाहायला मिळाले. एकूणच, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू झालेल्या चर्चांना राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे वेगळे वळण मिळाले आहे. मराठी नेतृत्वाचा मुद्दा पुढे आल्याने पक्षातील समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय कोणाकडे जातो आणि पुढील राजकीय घडामोडी कशा घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !