पोलिस आयुक्तांमुळेच वाहतूक कोंडी:अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू!
Category: Maharashtra |
01 Oct 2025
पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेमुळे वारंवार चर्चेत असलेले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलीस आयुक्तांच्या 'व्हीव्हीआयपी' दौऱ्यासाठी शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागातील वाहतूक थांबवण्यात आल्याने सर्वसामान्य पुणेकरांना नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ज्यांच्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यामुळेच कोंडी झाल्याचे चित्र शहरात दिसले. सारसबाग परिसरात वाहतूक रोखली ही घटना सारसबाग परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळ घडली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने, त्याच्या पूर्वीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आणि त्या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबवली. अत्यंत वर्दळीच्या वेळी स्वारगेटहून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. मंदिरासमोरील मुख्य चौकही वाहतुकीसाठी रोखण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त इतका मोठा होता की, जणू मुख्यमंत्रीच येणार आहेत असे वातावरण तयार झाले होते. यामुळे पोलीस आयुक्तांसाठी रस्ते बंद करण्याची नवी प्रथा पुण्यात सुरू झाली की काय, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी गेले दहा दिवस नवरात्रोत्सवामुळे सारसबाग परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्याऐवजी, स्वतः पोलीस आयुक्त अशा व्हीव्हीआयपी पद्धतीने आणि मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन दौरे करत असतील, तर सामान्य पुणेकरांनी दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यामुळेच सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.