रिल्स स्टार अथर्व सुदामेला PMP चा 'दणका':दोन नोटिसी बजावून उत्तर नाही; आता 50 हजारांचा दंड ठोठावला, तिसरी नोटीस जारी
Category: Entertainment |
08 Jan 2026
सोशल मीडियावर आपल्या विनोदी रिल्सने लाखो चाहत्यांची मने जिंकणारा रिल्स स्टार अथर्व सुदामे आता एका कायदेशीर फेऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने अथर्वला दोन रिल्सप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली आहे. वारंवार दिलेल्या नोटिसींना प्रतिसाद न दिल्याने पीएमपी प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अथर्व सुदामे याने काही दिवसांपूर्वी पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात एक रिल तयार केले होते. मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केलेल्या या रिलमध्ये त्याने प्रवाशांचे चित्रण केले होते. मात्र, हे चित्रीकरण करताना त्याने पीएमपी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. सरकारी मालमत्तेचा व्यावसायिक किंवा मनोरंजनासाठी वापर करताना रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते, ज्याचा भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पीएमपी प्रशासनाचे आक्षेप पीएमपी प्रशासनाने या रिल्सबाबत दोन मुख्य आक्षेप नोंदवले आहेत. पहिला म्हणजे प्रवाशांचा अपमान. संबंधित रिलमध्ये प्रवाशांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचे पीएमपीएमएलचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे परवानगीचा अभाव. पीएमपीच्या मालमत्तेचा जसे की, बस आणि गणवेश वापरताना अथर्व सुदामेने पीएमपी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई यापूर्वी पीएमपीने अथर्वला दोनदा नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, अथर्वकडून या दोन्ही नोटिसींना कोणताही लेखी प्रतिसाद मिळाला नाही. "प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये चित्रीकरण केले. याबाबत खुलासा करण्यासाठी अथर्व सुदामे यांना सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला खुलासा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आणखी एक नोटीस दिली असून, यात ५० हजारांचा दंड केला आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा करू," असा इशारा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला आहे. तिसऱ्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे? आपण पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन आणि बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करुन, परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड आणि प्रसारित केला. या प्रकरणी आपल्याला ०२/०१/२०२६ रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. आपणास सदरील नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे ४११०३७ येथे सादर करणेबाबत सुचित केले होते. "परंतु अद्यापही आपला खुलासा परिवहन महामंडळास विहित मुदतीत सादर केलेला नाही. परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन व बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर केल्याने दोन रीलचे प्रत्येकी रक्कम रु. २५,०००/- प्रमाणे एकुण रक्कम रु. ५०,०००/- इतकी रक्कम पुणे महानगर परिवहन महमहामंडळाकडून दंड म्हणून आकारण्यात येत आहे. सदरची रक्कम त्वरीत महामंडळाकडे जमा करावी. दंड रक्कम प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध भारतिय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदयानुसार एफआयआर दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी", असे देखील या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. रिल्स स्टार्ससाठी धोक्याची घंटा? अथर्व सुदामे याच्यावर झालेली ही कारवाई इतर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएनसर्ससाठी एक धडा मानली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी यंत्रणेचा वापर करून रिल्स बनवताना नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.