रोहित आर्याचा शवविच्छेदन अहवाल समोर:गोळी छातीतून आरपार गेल्याने झाला मृत्यू; पवई ओलीस प्रकरणात झाला होता एन्काउंटर
Maharashtra | 04 Nov 2025, 09:58 | Source: DivyaMarathi
मुंबईतील पवई येथील एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवून खळबळ माजवणारा आरोपी रोहित आर्य याचा एन्काऊंटरनंतर मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात आर्यच्या शरीरातून गोळी आरपार गेल्याचे उघड झाले असून, छातीत गोळी लागल्याने त्याचा तत्काळ मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. शुक्रवारी सायंकाळी रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला होता. अहवालानुसार, आर्यच्या छातीतून गोळी घुसून ती थेट पाठीतून बाहेर पडली होती. अशा गंभीर जखमेमुळे त्याची जिवंत राहण्याची किंचितही शक्यता नव्हती, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढण्यात आले, तसेच संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे चित्रीत करण्यात आली. पुढील रासायनिक चाचणीसाठी व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एन्काऊंटरनंतर सुमारे 24 तासांहून अधिक काळ कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. अखेरीस, शुक्रवारी सायंकाळी नातेवाईक दाखल झाल्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. पाच जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार रोहित आर्यवर शनिवारी पहाटे पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीवेळी त्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि दोन जवळचे नातेवाईक असे केवळ पाच जण उपस्थित होते. तणाव आणि 2 कोटींची थकबाकी रोहित आर्य हा महाराष्ट्र सरकारच्या 'स्वच्छता मॉनिटर' मोहिमेवर काम करत होता. या कामासाठी त्याने स्वतःच्या खिशातून दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केली होती. परंतु, सरकारकडून ही थकबाकीची रक्कम परत मिळत नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्याने मुंबईतील पवई येथील एका स्टुडिओमध्ये लघुपटाच्या ऑडिशनच्या नावाखाली राज्यभरातून 17 अल्पवयीन मुलांना बोलावले आणि त्यांना ओलीस ठेवून सरकारकडे देयके देण्याची मागणी केली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तातडीने कारवाई करत त्याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला आणि ओलीस असलेल्या 17 मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली.