रोहित पवारांकडून विदीप जाधवांच्या कुटुंबियांचे सांत्वन:दोन्ही मुलांशी संवाद साधत दिला आधार, दोघांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
Category: Maharashtra |
31 Jan 2026
बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांच्या सोबत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) आणि फलटण तालुक्यातील तरडगावचे सुपुत्र विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. आमदार रोहित पवार यांनी शनिवारी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांची मुलगी नेत्रा आणि मुलगा आद्विक यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना सावलीसारखी साथ देणारे त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही झाले. परंतु, फलटणच्या नेतेमंडळीना जे जमले नाही, ते आमदार रोहित पवार यांनी करून दाखविले. दिवंगत विदीप जाधव यांची मुले नेत्रा आणि अद्विक यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलून कुटुंबियांना आधार दिला. विदीप जाधव यांच्या दोन्ही मुलांशी संवाद साधताना रोहित पवार यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, विदीप जाधव यांनी अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. दुर्दैवाने दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दुःखात आहे तसेच विदीप जाधव यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःख शेअर केल्याने कमी होतं, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं जाधव कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला. खरं तर आमदार रोहित पवार केवळ सांत्वन करून थांबले नाहीत, तर त्यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. या घटनेतून त्यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे दर्शन घडले. पवार कुटुंबीयांना पुरोगामी आणि सामाजिक कार्याचा मोठा वारसा आहे. तेच संस्कार आमदार रोहित पवार यांच्या कृतीतून दिसले. हे ही वाचा… सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ:राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ; ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार आणि नेते उपस्थित होते. सविस्तर वाचा… शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांना खाते वाटप:उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकाससह तीन खात्यांची धुरा, पण महत्त्वाच्या खात्यापासून डावलले अजितदादांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्कासह तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मात्र, अजित पवारांकडील सर्वात प्रभावी मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते सुनेत्रा पवारांकडे न देता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतःकडेच ठेवले आहे. सविस्तर वाचा…