शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांना खाते वाटप:उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकाससह तीन खात्यांची धुरा, पण महत्त्वाच्या खात्यापासून डावलले
शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांना खाते वाटप:उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकाससह तीन खात्यांची धुरा, पण महत्त्वाच्या खात्यापासून डावलले
अजितदादांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्कासह तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मात्र, अजित पवारांकडील सर्वात प्रभावी मानले जाणारे 'अर्थ आणि नियोजन' खाते सुनेत्रा पवारांकडे न देता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतःकडेच ठेवले आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीच्या काही वेळानंतरच सुनेत्रा पवारांना अजित पवारांकडील खात्यांपैकी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास ही तीन खाती देण्यात आली आहे आहेत. राज्य उत्पादन शुल्क हे राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल मिळवून देणारे खाते मानले जाते. तरुणांशी संबंधित असलेल्या 'क्रीडा आणि युवक कल्याण' खात्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार राज्यभरात आपले जाळे विस्तारू शकतात. याशिवाय अल्पसंख्यांक विकास खाते देखील सुनेत्रा यांच्याकडे देण्यात आले आहे. अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडेच का? अजित पवार यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनानंतर हे महत्त्वाचे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे खाते स्वतःकडे ठेवल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक नियोजनासाठी अनुभवाची गरज असते. सध्याच्या संक्रमण काळात कोणतीही जोखीम न पत्करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. अर्थखाते हे सत्तेचे केंद्र मानले जाते. हे खाते स्वतःकडे ठेवून फडणवीस यांनी प्रशासनावर आपली मांड अधिक घट्ट केली आहे. ७२ तासांतील वेगवान घडामोडी २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली. त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन आज राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या काही वेळानंतरच त्यांना खात्यांचे वाटपही करण्यात आले. हे ही वाचा… 'राष्ट्रवादी'चे विलीनीकरण का थांबले?:पटेल-तटकरेंचा विरोध, भाजपचा खोडा की सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर नाराजी, वाचा सविस्तर...! राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीने नवे राजकीय प्रश्न निर्माण केले आहेत. या घाईगडबडीच्या निर्णयामागे पक्षांतर्गत पटेल-तटकरेंचा विरोध आहे की भाजपचा राजकीय खोडा, असा सवाल उपस्थित होत आहे. शरद पवार यांना माहिती नसताना घेतलेल्या निर्णयावरून वाद अधिकच तीव्र झाला आहे. सविस्तर वाचा…