शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा:ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीच्या संकटात महादेव जानकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा:ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीच्या संकटात महादेव जानकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हसवड येथे बोलताना केली. माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून म्हसवड शहरात पाणी शिरल्याने म्हसवड येथील व्यापारी वर्गाचे ही मोठे नुकसान झाले असल्याने महादेव जानकर यांनी म्हसवड शहराला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, जिल्हाध्यक्ष दादासाहेब दोरगे, म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपणच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन तातडीने पूर्ण करून अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, असा टोला लगावत शालेय विद्यार्थ्यांची शिक्षण फी माफ करावी सर्वं नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी केली. तसेच म्हसवड शहरात अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने अनेक व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून रस्त्याचे काम, शहरातून जाणारे गटर कामाच्या संदर्भात माहिती देत एमएसआरडीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अश्विनी घोडके यांना यापुढील काळात म्हसवड शहराला कुठलाही धोका निर्माण होणार नाही या बाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या संदर्भात मागणी केली. महादेव जानकर यांनी म्हसवड-विरकरवाडी या रस्त्यावरील माण नदी पुलाची पाऊस व नदीच्या पुराने झालेली दुरावस्था, शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.