शेतकऱ्यांचे हक्क दिले नाही तर तुम्हाला उडवून देऊ:काँग्रेस खासदाराची थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra | 04 Nov 2025, 09:15 | Source: DivyaMarathi

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना प्रशांत पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संतापले असून, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करावा, अशी मागणी पडोळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहनही पडोळे यांनी सरकारला केले. ... तर तुम्हाला उडवून देऊ प्रशांत पडोळे म्हणाले, "शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयांनी काय होते? धोरणं बदलाना साहेब. धोरणं बदलाना आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही आणि त्यांचा हक्क दिला नाही, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, यावेळेस आम्ही तुम्हाला उडवून देऊ साहेब." अशी धमकीच खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. बच्चू कडू, तुपकरांकडूनही वादग्रस्त विधान दरम्यान, यापूर्वी माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना 'आत्महत्या करू नका, त्याऐवजी आमदाराला कापा,' असे वक्तव्य केले होते. तसेच, त्यांचे सहकारी रविकांत तुपकर यांनी देखील, "'बच्चू भाऊंनी आमदाराला कापण्यास सांगितले होते. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, दोन चार मंत्र्याला कापा, पण आता मागे हटायचे नाही., असे विधान केले होते. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्यानंतर आता खासदार प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर केला. या धमकीमुळे लोकप्रतिनिधींच्या आक्रमक आणि हिंसक भाषेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून असंतोष वाढत असला तरी, लोकप्रतिनिधींकडून असा आक्षेपार्ह भाषेचा वापर होणे गंभीर मानले जात आहे. हे ही वाचा... सह्याद्री अतिथीगृहावर 'कर्जमाफी' बैठकीत खडाजंगी:मुख्यमंत्री फडणवीस चिडचिड करत होते; रविकांत तुपकरांचा खुलासा शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन छेडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीची इनसाईड स्टोरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उघड केली आहे. कर्जमाफीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचंड चिडचिड करत होते आणि मोठी खडाजंगी झाल्याचा खुलासा रविकांत तुपकर यांनी केला. सविस्तर वाचा...