शेतकऱ्यांना मदतीची भाजप सरकारची मानसिकता नाही:सरकारचे 12 वाजवा, ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले; सत्ताधाऱ्यांचा घेतला समाचार
Category: Maharashtra |
04 Oct 2025
शेतकऱ्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांची मानसिकता, भूमिकाच नाही. दिवाळीत मदत देऊ, असे महायुती सरकारने जाहीर केले. मात्र शेतकरी, वंचितांना मदत करणे हा या ‘भाजप-आरएसएस‘चा पायंडा नाही. यातून आता अतिवृष्टीबाधित, पूरग्रस्तांनी धडा घ्यावा. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे बारा वाजवण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शुक्रवारी रात्री झालेल्या धम्ममेळाव्यात ते बोलत होते. ओबीसींचा घात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला असून, याची जाणीव ओबींसीनी ठेवावी; तरच आरक्षण वाचेल. ओबीसींना स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. बेरोजगारीही मिटू शकते. गरीबांना यांच्या हक्काचा निवाराही मिळू शकते. मात्र यासाठी जनतेने हिंमत दाखवला हवी. शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे बारा वाजवण्याची भूमिका घेणे आवश्यक. आम्ही तुम्हाला मत दिले असून, तुम्ही मालक झाले नाहीत. मालक होण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी, सामान्यांनाही सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. लोकांमध्ये एकोपा होऊ नये, यासाठी ओबीसी- मराठा- मुस्लिम यांच्यात भांडणे लावणे सुरू आहे, अशा शब्दात अॅड. आंबेडकर यांनी सरकारचा समाचार घेतला. सरकारकडे पैसा नाही तर मंत्री, खासदार, आमदारांची श्रीमंती कशी वाढते हे सांगा, असा सवाल यांनी केला. आगामी जि.प. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आरक्षण काढणाऱ्यांना मतदान करणार नाही, अशी खूणगाठ ओबीसींनी बांधावी. त्यासाठी स्वत:चा राजकीय चेहरा उभा करावा लागेल. त्यांच्या एका बड्या नेत्याचे घांेगडे अडकले आहे. सत्ताधाऱ्यांनी ते जर काढले तर त्या नेत्याला तिहार जेलमध्ये जावे लागेल, असा टोला त्यांनी नाव न घेता भुजबळांना लगावला. सध्यातरी ‘वंचित’ शिवाय आेबीसींना दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले. सध्याच्या स्थितीत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन आदी देश पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. अशा स्थितीत यु्द्ध झाल्यास हे सर्व देश पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवतील. मग भारताचा कितपत टिकाव लागेल, हा प्रश्न आहे. तसेच विदेशात मोठ्या संख्येने नोकरीत असलेल्या भारतीय सवर्णांना अमेरिका व इतर युरोपियन देश भारतात परत पाठवण्याची तयारी करत आहेत. ही दोन्ही विदेशी संकटे स्वत:ला विश्वगुरु म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंहकारी स्वभावामुळे देशापुढे उभी ठाकली आहेत, असे सांगून अॅड. आंबेडकर म्हणाले की, ही परिस्थिती थांबवायची असेल तर विश्वगुरू मोदी यांना लवकरच टाटा बाय बाय करा.