शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही, पण सुनेत्रा वहिनींचा निर्णय कौतुकास्पद:अजितदादांचा वारसा समर्थपणे चालवतील - मुख्यमंत्री फडणवीस
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही, पण सुनेत्रा वहिनींचा निर्णय कौतुकास्पद:अजितदादांचा वारसा समर्थपणे चालवतील - मुख्यमंत्री फडणवीस
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईतील लोकभवन येथे अत्यंत साध्या आणि भावूक वातावरणात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया देत, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच त्या अजित पवारांचा वारसा समर्थपणे चालवतील, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांच्या राजकीय वचनबद्धतेचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रसंग कठीण होता...पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. फडणवीस म्हणाले, शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही... पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील," असे पंतप्रधान आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. अमित शाह काय म्हणाले? "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन. अजित पवारजी आयुष्यभर शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सक्षमीकरण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती द्याल", अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. शपथविधीवेळी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विधानभवनात शपथविधी सोहळा सुरू असताना उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. ज्यावेळी सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या, त्यावेळी कार्यकर्त्यांनी "अजित पवार अमर रहे, अमर रहे" अशा घोषणा दिल्या. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.