उंच माझा झोका:अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर, सांगलीमध्ये 5 नोव्हेंबर रोजी जब्बार पटेलांच्या हस्ते होणार गौरव
उंच माझा झोका:अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर, सांगलीमध्ये 5 नोव्हेंबर रोजी जब्बार पटेलांच्या हस्ते होणार गौरव
आपल्या अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उठवणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना यंदाचा विष्णुदास भावे पदक पुरस्कार जाहीर झालाय. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरदा कराळे यांनी शुक्रवारी सांगली ही घोषणा केली. रोख 25 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रंगकर्मीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे 58 वे वर्ष यंदा पुरस्काराचे 58 वे वर्ष आहे. नीना कुलकर्णी यांचा 5 नोव्हेंबर रोजी सांगलीतल्या भावे नाट्यगृहात गौरव होईल. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे उपाध्यक्ष विलास गुप्ते, कार्यवाह बलदेव गवळी, कोषाध्यक्ष मेघा केळकर, सदस्य जगदीश कराळे, डॉ. भास्कर ताम्हनकर, आनंद पाटील, विवेक देशपांडे, बीना साखरपे, भालचंद्र चितळे, आनंद जाधव, व्यवस्थापक प्रकाश पाटील उपस्थित होते. चौफेर मुशाफिरी नीना कुळकर्णी यांनी अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका ते निर्माती अशी चौफेर भूमिका अतिशय व्यवस्थितपणे निभावली आहे. त्यांचा जन्म 1955 मध्ये झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. कॅनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे एलिफिस्टन कॉलेजमधून फ्रेंच भाषेत पदवी मिळवली. त्यांनी 1970 च्या सुमारास मॉडेलिंग सुरू केली. 'गुंतता हृदय हे' या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. पंडित सत्यदेव दुबे यांच्या दिग्दर्शनाखाली आधे अधुरे, मायावी सरोवर, अबे बेवकूफ, आह, एज्यकेटिंग रीटा अशा प्रयोगशील नाटकांची वाट धुंडाळली. नाटक ते दूरचित्रवाणी डॉ. विजया मेहता यांच्या हमीदाबाईची कोठी या नाटकामध्ये त्यांनी केली शब्बोची भूमिका संस्मरणीय ठरली. महासागर, सावित्री, अकस्मात, ध्यानीमनी, सर्वस्वी तुझीच, वटवट सावित्री, आईचं घर उन्हात, देहभाग, प्रेमपत्र, असेन मी नसेन मी अशा अनेक नाटकांमधून काम केले. दूरचित्रवाणीवरील 'उंच माझा झोका'मध्ये त्यांनी केलेली भूमिका लक्षात राहिली. नाटके - महासागर - एज्युकेटिंग रिटा - ध्यानीमनी - छापा-काटा - हमिदाबाईची कोठी - वाडा चिरेबंदी मालिका - ये है मोहब्बतें - अधुरी एक कहाणी - उंच माझा झोका - लज्जा - थोडा है थोडे की जरूरत है - स्वराज्यजननी जिजामाता - येड लागलं प्रेमाचं मराठी चित्रपट - शेवरी - गंध - गेम ऑफ थ्रोन्स - शर्यत - अनुमती - आधारस्तंभ - मोगरा फुलला - येस आय कॅन - सवत माझी लाडकी - सातच्या आत घरात - सरींवर सरी - पछाडलेला - उत्तरायण हिंदी चित्रपट - हसी तो फसी - नायक - कुछ तुम कहो, कुछ हम कहे - मेरे यार की शादी है - मिर्च मसाला - ढाई अक्षर प्रेम के - भूतनाथ