संजय राऊत कुणावरही बोलण्याचा उपमर्द करतात:पण आपण अमित शहांना रोज नमस्कार करावा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

खासदार संजय राऊत हे परमेश्वरावर, महापुरुषावर किंवा महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस व उपमर्द करू शकतात. पण आपण कलम 370 रद्द केल्यामुळे रोज अमित शहा यांना नमस्कार केला पाहिजे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ठाकरे गटावर निशाणा साधताना व्यक्त केले. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांना स्वप्नदोषाचा आजार जडल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या टीकेवर भाजपच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका करत तेच असे बोलण्याचा उपमर्द करू शकतात असा दावा केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार संजय राऊत अमित शहाच नाही तर परमेश्वर, महापुरुष किंवा एखाद्या महान नेत्यावरही बोलण्याचे धाडस व उपमर्द करू शकतात. पण आपण जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे रोज अमित शहा यांना नमस्कार केला पाहिजे. अमित शहा एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते 2029 च्या निवडणुकीविषयी बोलले असतील. उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 170 हून अधिक जागा निवडून येण्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटकपक्षांच्या 170 हून अधिक जागा निवडून येतील. कारण, लाडकी बहीण योजनेसह अनेक चांगल्या योजना सरकारने जनतेला दिल्या आहेत. जनता त्याचे भान राखेल. पण काहींना उपकारांची जाणीव नसते. त्यांनी ती ठेवली असती तर 2019 मध्येच राज्यात युतीचे सरकार आले असते. आता त्यांचे जे नुकसान झाले ते झाले नसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीच्या काळात साथ देणाऱ्यांना केव्हाही अंतर देत नाहीत. त्यामुळे राधानगरी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी प्रकाश अबिटकर यांनाच मिळेल, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केला. आमदार भुयारांना माफी मागण्यास सांगेन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र यांच्या महिलांविषयीच्या कथित वादग्रस्त विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले, आमदार देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल, तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन.

Share

-