अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई:चंद्रशेखर बावनकुळेंचा अनधिकृत उमेदवारांना इशारा

एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणूक संचालन समितीने अशा पदाधिकाऱ्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला. अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करील, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शरद पवार आणि कॉंग्रेसने फसवणूक केली असून रामटेक मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत आहे. रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून केलेला अपमान होय, असा टोलाही बावनकुळे यांनी हाणला. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करीत असताना तो नाना पटोले यांना दिसत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले. चार जागांसाठी उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतची युती तोडली होती अशी आठवण बावनकुळे यांनी करून दिली. उद्धव ठाकरे यांचा भाजपाकडून सन्मान केला जात होता. युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे बरोबरीने आणि भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढत होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते. आता ते मुख्यमंत्री पदाच्या लोभामुळे फसले आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार सोडला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी मते मागितली होती. या निवडणुकीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन सामाजिक असून राजकारणाशी जोडू नये. सत्तेमुळे समाजाला न्याय मिळतो. भाजपाने मराठा समाजासोबत न्यायची भूमिका ठेवली आहे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल.प्रभावी नेतृत्त्व पक्षात आल्यास त्यास पक्षवाढ म्हणतात. महाविकास आघाडीचा नेमका अजेंडा काय आहे, हे कळायला हवे. महाराष्ट्राला क्रमांक एक करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात काय आहे ते जनतेला काय देणार आहे.

Share

-