उमरान, शार्दूल, दीपक… सगळ्यांना धक्का देऊन T20 वर्ल्डकप संघात ५ भिडूंना जागा मिळणार?

मुंबई : आशिया कप स्पर्धेतला पराभव विसरुन आता भारतीय संघाने आगामी टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे, असं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या एकदिवसीय मालिकेसाठी सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विश्वचषकात खेळणाऱ्या विराट, रोहितसह इतरही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी ब्रेक दिला जाईल. रोहितऐवजी धवनकडे भारतीय संघाची धुरा दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांत टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा होईल. यामध्ये गेल्या काही महिन्यात ज्यांनी कमी संधी मिळूनही चमकदार कामगिरी केलीये, त्यांचा विचार होऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच टी ट्वेन्टी विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत असल्याने तेथील परिस्थितीला अनुकूल खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.

शार्दूल ठाकूर : भारतीय संघातील महत्त्वाच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे शार्दूल ठाकूर. आपल्या बॅटिंग आणि बोलिंगने शार्दूल एकहाती सामना फिरवू शकतो. तडाखेबंद खेळीने त्याने याअगोदरही अनेक सामने फिरवले आहेत. बोलिंगमध्येही त्याने आपल्या वेगाने प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनला विचार करायला भाग पाडलं आहे. टी ट्वेन्टी विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत असल्याने तिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. अशा परिस्थितीत शार्दूलच्या समावेशाने भारतीय संघाला पूर्ण ४ ओव्हर टाकणारा बोलर आणि डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करणारा बॅट्समन मिळेल. एकंदर भारतीय संघात शार्दूलचा समावेश झाला तर भारतासाठी फायदेशीर राहिल.

दीपक चाहर : दीपक चाहर आपल्या वेगासाठी आणि स्विंगसाठी ओळखला जातो. पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाची सलामाची जोडी फोडण्यात तो माहिर आहे. आपल्या स्विंगने तो भल्याभल्या फलंदाजांना चकवा देऊ शकतो. भरीस भर म्हणजे ऑस्ट्रेलियातली कंडिशन चाहरला अनुकूल असणार आहे. नुकताच तो दुखापतीतून सावरला आहे. मात्र त्याचा समावेश आशिया चषकात होऊ शकलेला नव्हता. बुमराहच्या साथीला वेगवान गोलंदाजाचा विचार होईल तेव्हा नक्की चाहरच्या नावावर चर्चा होऊ शकते.

दीपक हुडा : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्याने दीपक हुडाची भारतीय संघात एन्ट्री झाली, टी ट्वेन्टीमध्ये त्याने दिमाखदार शतकही झळकावलं. पण सिनिअर प्लेयर्सच्या आगमनामुळे त्याला अधिक काळ खेळण्याची संधी मिळाली नाही. मधल्या फळीत येऊन धावांचा वेग वाढवणं आणि मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करुन संघाला सुस्थितीत नेणं ही जबाबदारी दीपक पेलू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे गरज पडल्यास हुडा एक-दोन ओव्हरही टाकू शकतो.

इशान किशन : टीम इंडियात विकेट कीपर म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकची जागा पक्की आहे. दोघेही उत्तम दर्जाची विकेटकिपिंग करतात आणि शेवटच्या काही षटकांत तुफान फटकेबाजी करुन सामनाही फिरवतात. पण डावखुरा फलंदाज इशान किशनचा सलामीवीर म्हणूनही भारतीय संघात विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. इशान कोणत्याही नंबरवर फलंदाजी करु शकतो, हे त्याच्या जमेची बाजू आहे.

उमरान मलिक : आयपीएलमध्ये आपल्या खेळाने सर्वांना चकित करणाऱ्या उमरान मलिकने याआधीच टीम इंडियासाठी पदार्पण केलंय. त्याला आयर्लंड मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली, पण सिनिअर खेळाडू परतल्याने त्याला संघात स्थान मिळवता आलं नाही. ऑस्ट्रेलियात, जिथे चेंडू प्रचंड वेगाने जाईल आणि बाउन्स होईल, तिथे उमरान मलिक टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published.