तुमचे सरकार स्थापन झाले की उपोषणाची तारीख सांगणार:मराठे पुन्हा तुमच्या छातडावर बसणार, महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगेंचा इशारा

आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावर दिली आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगेंचा परिणाम फेल झाला असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले, मी सरकारला सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीने द्यायचे. नसता मराठे पुन्हा छातडावर बसणार आहेत. सरकार अन् फरकार कितीकं येऊन जातेत आणि मराठे गुडघे टेकायला लावतेत. आमच्यासोबत बेईमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणार आहे तुमचे सरकार बसले की लगेच उपोषणाची तारीख ठरवून डिक्लेर करणार आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यांचे सरकार आले आहे, त्याबाबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यांवर आहेत. पण मराठा अरक्षणात खोडा घालायचा नाही महितर मराठे तुम्हाला टाळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. मनोज जरांगे पाटील म्हणाले, एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावे तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावे. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला. जेवढे लोक निवडून आलेत ना त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे, असे जरांगे म्हणाले. एखाद्या आमदाराने म्हणावे की तो मराठ्यांच्या जिवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल, तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही. हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेले आहे. आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्या सारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत नाही जायचे आणि माझेच आहे म्हणायचे. आमच्या फॅक्टरमुळेच सरकार आले. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय आहे, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत अनपेक्षित आला असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तसेच महाविकास आघाडीचा अत्यंत दारुण असा पराभव या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे.

Share

-