पराभवाचे असे भांडवल करत जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही:’ईव्हीएम’वरून रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला, मविआवरही केली टीका

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुती सत्तेत आली. केवल सत्तेत आली असे न होता प्रचंड बहुमताने विजय मिळवत महाविकास आघाडीसह इतर सर्वच पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. यामुळे आता विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यास सुरू केले आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली असल्याने याला आणखी जोर मिळाला आहे. या सगळ्यावर आता ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवत आहेत. मात्र, याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमोर ईव्हीएमची विशेष तपासणी घेतली आहे. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, असे म्हणत निकम यांनी महाविकास आघाडीवर टीका देखील केली आहे. पुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे जर प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कोणतीच गोष्ट कोर्टात टिकू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. दरम्यान, सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील येथे सभा घेत या विषयाला आणखी बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी येथे जमावबंदी देखील लागू केली होती.

Share

-