वडी फाटा येथील बस थांबा; सर्व्हीस रोडचे काम संथ गतीने:अपघाताला महिना झाला, तरी कामाला गती नाही‎

नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कामाला गती न मिळाल्याने या रस्त्यावरील गावांतील नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या महामार्गावर अपघात होऊन महिना उलटला आहे, तरीही रस्त्याचे काम रखडलेले आहे. वास्तविक या कामाबाबतचे लेखी पत्र वडी सरपंचाना मिळाले होते. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराची दिरंगाई यामुळे या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर वडी फाटा येथे २९ ऑक्टोबरला कंटेनरने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यामुळे दोन शेतमजूर महिला सरिता दत्तात्रय भोकरे व शारदा विजय तायडे या जागीच ठार झाल्या. तर १४ महिला जखमी झाल्या होत्या. या वेळी गावकऱ्यांनी पाच तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पाडली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक श्रीकांत ढगे यांनी १० नोव्हेंबर पासून वडी गावासाठी बस थांबा व सर्विस रोड तसेच इतर सुविधा देण्याबाबत लेखी पत्र घटनेच्या दिवशी सरपंच ग्रामपंचायत वडी यांना दिले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार १० नोव्हेंबरला कामास सुरुवात केली. मागील १८ दिवसांत थोडेसे माती काम केले. त्यानंतर आजवर कुठल्याही कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. तसेच काम अतिशय संथ गतीने सुरू असून सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. विधानसभेमुळे वाहतुक परवानगी नसल्याने हे काम रखडले असल्याचे सांगण्यात आले. ^विधानसभा निवडणुकीमुळे मुरुम वाहतुकीकरीता परवानगी मिळाली नाही. यामुळे काम रखडलेले होते. काही नागरिकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण काढण्यास विरोध करत आहेत. अतिक्रमण धारकांनी सहकार्य न केल्यास पोलिसांच्या मदतीने आम्ही ते काम पूर्णत्वास नेऊ. – श्रीकांत ढगे, व्यवस्थापक भारतीय महामार्ग प्राधिकरण.

Share

-