दुसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याला संघाबाहेर का केले, रोहित शर्माने सांगितले मोठे कारण…

 

दुबई : हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने हार्दिक पंड्याला संघाबाहेर करत मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने गेल्या सामन्यात चमकदार अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. पण रोहितने तरीही हार्दिकला संघाबाहेर का केले, याचे कारण आता समोर आले आहे.

आजच्या सामन्यासाठी रोहित शर्मा टॉसला आला. पण या सामन्यात त्याला टॉस गमवावा लागला. टॉस झाल्यानंतर रोहित शर्माने या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर केला. यावेळी रोहितने हार्दिक पंड्या खेळणार नसल्याचे सांगितले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावेळी हार्दिकला संघात स्थान का देण्यात आले नाही, हेदेखील रोहितने स्पष्ट केले.

रोहित शर्मा म्हणाला की, ” हार्दिकने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. आमच्यासाठी हार्दिक हा महत्वाचा खेळाडू आहे. या पुढच्या सामन्यांंमध्येही तो संघाबरोबर असावा, अशी आम्हाला इच्छा आहे. त्यामुळे या सामन्यात आम्ही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना जास्त दुखापत होऊ नये, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या जागी भारतीय संघात रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे.”

हार्दिक पंड्यासाठी आली होती गूड न्यूज…
आजचा सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिकसाठी एक आनंदाची बातमी आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवारी नवी टी-२० क्रमवारी जाहीर करण्यात आली. ताज्या क्रमवारीत ऑलराउंडरर्सच्या यादीत हार्दिक पंड्या पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शानदार कामगिरीमुळे हार्दिकला क्रमवारीत ८ स्थानांचा फायदा झाला आहे. ही हार्दिकची टी-२० करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. क्रमवारीत हार्दिकचे १६७ गुण झाले आहेत. टी-२०मधील ऑलराउंडरच्या यादीत पहिल्या १० मध्ये असलेला तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिकने ३ विकेट आणि ३३ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरीमुळे हार्दिकवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर मोठ्या कालावधीसाठी तो संघातून बाहेर होता. आयपीएलमध्ये गुजरात संघाला पहिल्याच हंगामात त्याने विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर भारतीय संघाकडून त्याने सातत्याने सामने जिंकून दिले आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published.