येवल्यात छगन भुजबळांच्या विरोधात उमेदवार ठरला?:जयंत पाटलांची घेतली कुणाल दराडेंनी भेट
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून कुठल्या उमेदवाराला संधी द्यायची याबाबत चाचपणी देखील सुरू आहे. येवला मतदारसंघात कुणाल दराडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. येवला मतदारसंघ हा मानंतरी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवारांकडून कुणाल दराडे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुणाल दराडे हे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव आहेत. कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. जयंत पाटील आणि कुणाल दराडे यांची जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली, यावेळी शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे देखील उपस्थित होते. यापूर्वी देखील कुणाल दराडे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली होती. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला येवला विधानसभेची जागा मिळाली तर कुणाल दराडे तुतारी हातात घेऊ शकतात. तसे झाले तर येथे दराडे विरुद्ध मंत्री भुजबळ अशी निवडणूक रंगेल. मात्र, सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद सुरू असल्याने याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. यातच मराठा नेते मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम झाल्यास येवला मतदारसंघात कुणाल दराडे यांची उमेदवारी छगन भुजबळ यांना आव्हानात्मक ठरू शकते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांकडून सेटिंग लावली जात आहे, भेटी घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा मुद्दा घेत राज्यभर प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत.