
जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशांत कोरटकर कारागृहाच्या बाहेर:शिवप्रेमींचा रोष पाहता पोलिस संरक्षणात जिल्ह्याच्या बाहेर सोडणार
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे. मात्र, न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कारागृहाला जामीनाची कागदपत्रेच मिळाली नसल्याने त्याचा मुक्काम वाढला होता. अखेर प्रशांत कोरटकरचा कारागृहातील मुक्काम आज संपला असून तो बाहेर पडला आहे. त्याला पोलिस संरक्षणात जिह्याच्या बाहेर सोडण्यात येत आहे. प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याला महिन्याभरापूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने तो जामिनासाठी प्रयत्नशील होता. त्याच्या जामिनावर दोन दिवसांपूर्वीच सुनावणी झाली होती. त्यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर झालेल्या संक्षिप्त सुनावणीत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार आता त्याची सूटका झाली आहे. कोर्टाने यापूर्वी त्याला प्रथम 3, तर नंतर 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तेव्हाच त्याला जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानुसार त्याला जामीन मिळाला. प्रशांत कोरटकरला पहिल्यांदा 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. मात्र न्यायालयातून बाहेर येताच शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. कोरटकला जामीन मिळेल अशीच कलमे त्याच्यावर लावण्यात आली होती दुसरकीडे, इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामिनावर भाष्य करताना कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा अशाच स्वरुपाची कलमे त्याच्यावर लावण्यात आली होती. या माध्यमातून त्याला 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा मिळू नये याची काळजी घेण्यात आली होती. अशा प्रकरणात जामीन होत असतो. पण जामीन देताना कोणती कारणे विचारात घेण्यात आली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आम्ही देखील त्याचीच वाट पाहत आहोत. केवळ कलमे व त्या कलमांमध्ये किती शिक्षा होणार याचा विचार करून प्रक्रियावादी पद्धतीने जामीन देणे हे कुठेतरी थांबले पाहिजे. हे पाहून आम्हाला वाईट वाटते. या प्रकरणात न्यायाधीशांची कोणतीही चूक नाही. त्यांनी प्रक्रियांचा विचार करूनच जामीन दिला आहे. पण प्रशांत कोरटकर आता पुराव्यांवर दबाव आणणे, साक्षीदार फोडणे आदी कामांमध्ये गुंतला जाऊ शकतो. त्याला अटींच्या आधारावर जामीन मिळाला आहे. त्याने त्या अटींचे पालन केले नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू, असे सरोदे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. असीम सरोदे यांची अब्रुनुकसानीची नोटीस उल्लेखनीय बाब म्हणजे असीम सरोदे यांनी गत सोमवारीच प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कारागृहाच्या पत्त्यावरच अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. कोरटकरने आपल्या जामीन अर्जात इंद्रजित सावंत यांच्यावरच शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सरोदे यांनी त्याला अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. असीम सरोदे आपल्या नोटीसीत म्हणाले होते की, माझे अशील (इंद्रजित सावंत) हे कायद्याचे पालन करणारे व्यक्ती आहेत. ते इतिहास संशोधक आहेत. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा विशेष अभ्यास केला आहे. ते आपल्या अभ्यासाचे तथ्यात्मक पैलू अतिशय सभ्य पद्धतीने मांडण्यासाठी ओळखले जातात. पण विविध न्यायालयांत तुम्ही चुकीचे व मानहानीकारक दावे लिखित स्वरुपात दाखल माझ्या अशिलाची गंभीर मानहाणी केली. अशा प्रकारच्या परिच्छेदात तुम्ही इंद्रजित सावंत यांना एक वाईट व्यक्ती म्हणून चित्रित केले. यामु्ळे त्यांच्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेला जबर धक्का बसला.