News Image

हिंगोली शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई:अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 126 वाहनांना अडीच लाख रुपयांचा दंड


हिंगोली शहरात शहर वाहतूक शाखेच्या वतीने ड्रिंक अँड ड्राइव्ह सोबतच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच विनापरवाना वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गुरुवारी ता.10 कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये 126 वाहनांवर कारवाई करून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे विनापरवाला वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढली असून वाहतूक नियमांचे पालन न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे प्रकार होत आहेत. वारंवार सूचना देऊन देखील वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गणेश शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी वाहतूक शाखेला सूचना देत तातडीने कारवाईची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हिंगोली शहरामधध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक तांबोळी, उपनिरीक्षक घुमनर, पोलीस कर्मचारी शेषराव राठोड गजानन राठोड गजानन दांडेकर, कपिल जाधव, राजकुमार सुर्वे, शिवाजी पारस्कर, संतोष घुगे यांच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाईची मोहीम हाती घेतली. गुरुवारी सायंकाळी हाती घेतलेल्या या मोहिमेमध्ये अवघ्या दोन तासांमध्ये 126 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून दोन लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस विभागाची ही मोहीम सुरूच राहणार असून वाहन चालकांनी दारू पिऊन वाहने चालवू नये तसेच दुचाकी वाहनांना कर्णकर्कश्य आवाजाचे हॉर्न बसवू नयेत, वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी केले आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वेळप्रसंगी वाहन चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याची शिफारस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.