
उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमध्ये आल्यावर मासे बंद ठेवा:कोकणात केवळ मासे खायला येतात, नारायण राणेंची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार एव्हा हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे, असे आदेश भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिले आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठी कोकणात येतो, अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. खासदार नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतो. त्यामुळेच तो आला की हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे असे मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितले आहे, असे नारायण राणे म्हणाले. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दील नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पहा. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती पैसे दिले? त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. चिपी विमानतळाविषयी बोलताना नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन आता इंडिगो विमान पण येणार आहे. आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. तसेच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येणाऱ्या 60 फूट उंचीचे पुतळ्याचे 1 मे रोजी अनावरण होणार असल्याची माहितीही नारायण राणे यांनी दिली आहे.