
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण:एनआयएला लागेल ती मदत करण्यास तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून गुरुवारी रात्री भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याला तिथून एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आले व त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारने यशस्वीपणे तहव्वूर राणाला भारतात आणले याचा मला आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम मला अतिशय आनंद होत आहे की मुंबई हल्ल्यातील हल्लेखोरांना तसेच या हल्ल्याचे षड्यंत्र रचणाऱ्या तहव्वूर राणाला भारत सरकारने यशस्वीपणे भारतात आणले आहे. आता त्याला आपल्या देशातील न्यायव्यवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. एनआयएला लागेल ती मदत करु पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी असे समजतो की आपल्यावर एक तणाव होता की आपण कसाबला तर फाशी दिली, परंतु या हल्ल्याचे षड्यंत्र रचणारा अजून बाकी आहे. आता त्याला देखील भारतात आणण्याचे काम भारत सरकारने केले आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. विशेषतः त्या समस्त मुंबईकरांतर्फे ज्यांनी आपल्या प्रियजनांना या हल्ल्यात गमावले आहे. आता तपासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हे प्रकरण एनआयए लीड करत आहे. एनआयएची संपूर्ण टीम यात विचारपूस करत आहे. या तपासात महाराष्ट्र सरकारकडून तसेच मुंबई पोलिसांकडून एनआयएला जी कुठली मदत लागेल ती सर्व मदत आम्ही पुरवू, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स वर लिहिले - देशातील सर्वात मोठ्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. मोदीजी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात सुमारे एक महिन्यापूर्वी चर्चा झाली होती. त्यांच्या मते, अमेरिकेने भारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला हद्दपार केले. यासाठी मी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचेही अभिनंदन करतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवरील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तहव्वुर राणाला कठोर शिक्षा होईल यात शंका नाही.