
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही:अशा लोकांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे, फडणवीस यांनी दिले कायदा करण्याचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करण्याप्रकरणी एक कायदा करण्याचे संकेत दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरेतर टकमक टोकावरून लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामु्ळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील, असे ते म्हणालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा रायगडावर केवळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून आले नाहीत, तर ते छत्रपती शिवरायांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून आलेत. रघूजी राजे आंग्रे यांनी योग्य सांगितले. ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई, कुतूबशाही, आदिलशाही होती. त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते. मोडकळीस येत होते. लढून संपत होते. वाटत होते परकीय आक्रमकांचे राज्य संपणार नाही. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक सूर्य उगवला. ते नसते तर आपण कुणीच नसतो. त्यांच्यामुळे आपण देश आणि धर्माचे काम करत आहोत. छत्रपतींनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातले तेज जागृत केले. सामान्य मावळ्यांना विरांमध्ये परावर्तीत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केला. त्यानंतर हिंदवी भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला. संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला तो केवळ शिवरायांमुळे. महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही फडणवीस म्हणाले, आमच्या उदयन महाराज यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायची आहे. सरकार ती करेलच. पण महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे या प्रकरणी काही निश्चित नियम तयार केले जातील. शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारकडून तयार केला जाईल. हे काम सरकार आपल्या हातात घेईल. अरबी समुद्रातील स्मारक पूर्ण करण्याचा निश्चय देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची ग्वाहीही यावेळी दिली. ते म्हणाले, अरबी समुद्रातील स्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. पण आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवले होते. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. सरकार हा खटला हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळे करून घेईल. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे हा प्रयत्न आपला असेल, असे ते म्हणाले. दिल्लीतही राष्ट्रीय स्मारक करण्याचे संकेत ते पुढे म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी केली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे. मी अमित शहा यांना मदत करण्याची विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून नॉमिनेट केले आहे. आता 18 ते 21 या कालावधीत फ्रान्समध्ये युनेस्कोपुढे आमचे सादरीकरण होणार आहे. मी व आशिष शेलार तिकडे जाणार आहोत. मला विश्वास आहे की, आपले 12 किल्ले हे केवळ भारताचा नाही तर विश्व वारसा म्हणून दर्जा प्राप्त होईल. महाराष्ट्रातील आपले सरकार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी काम करताना आमच्यासमोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श व भारताचे संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचे सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो, असेही ते यावेळी म्हणाले.