News Image

'सामना'मुळे उद्धव ठाकरेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात:सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, राऊतांच्या अग्रलेखावरून बावनकुळेंची टीका


'सामना'तील अलिकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सर्व संपल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल. पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून केली. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार पलटवार करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना‘ तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राऊतांनी महाराष्ट्रात भांडण लावण्याचा प्रयत्न केला अकलेचा कांदा... म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा खोचक टोला बावनकुळे यांनी राऊतांना लगावला. आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते, असेही बावनकुळे म्हणाले. फडणवीसांवर आरोप करणाऱ्यांना बुडच नाही महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना लगावला. बगलबच्चे नवा शोध लावून बोंबलत सुटले अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न‘ द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही आणि आता त्यांचे बगलबच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटले, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...तेव्हा उद्धव ठाकरे काहीच करू शकणार नाहीत महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला. तरी अक्कल ठिकाणावर आली नाही. उद्धव ठाकरे यांना कळतच नाही की, नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा आहे. सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत.