
बीड जिल्हा पुन्हा चर्चेत:दोन गटात तुफान दगडफेकीमुळे नागरिक जखमी; झेंडा लावण्याच्या कारणामुळे झाला वाद, तणावपूर्ण शांतता
बीड जिल्ह्यातील आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300 तरुणांनी रस्त्यावर एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. तर काहींनी हातात लाकडी दांडे आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दगडफेकीत काहीजण जखमी झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यातच संतोष हत्या प्रकरण आणि खोक्या प्रकरण ताजे असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी गावात दोन गट परस्परांशी भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बीड ची ओळख आता गुन्हेगारी जिल्हा म्हणून होताना दिसत आहे. दगडफेकीत गावातील नागरिक जखमी याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आष्टीच्या खडकत गावामध्ये एका चौकात झेंडा लावण्या वरून हा वाद सुरू झाला. हा वाद अति टोकाला पोहोचल्यानंतर दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील झाली. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत गावातील नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सध्या या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.