News Image

अजित पवार आमची परीक्षा घेतात आणि अडचण होते:शिंदे गटाचे मंत्री प्रकाश आबिटकरांच्या भावना, दादांच्या कामांचे केले कौतुक


उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा आणि सकाळीच कामाला सुरुवात करण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजताच हजेरी लावली. यावर अजित पवार हे आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असे म्हणत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दादांच्या कामाचे कौतुक केले आहे. आरोग्य भवनाच्या नवीन इमारतीच्या भूमी पूजन समारंभाचे आयोजन आज पुण्यात करण्यात आले होते. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. या अंतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नवीन वीस रुग्णालयाचे लोकार्पण देखील अजित पवार यांच्या हस्ते केले गेले. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अजित पवारांचे कौतुक करत त्यांच्या वेळेवर येण्याच्या शैलीचा देखील उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांच्या कामाची पद्धत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर त्याच जागी प्रतिक्रिया देण्याच्या शैलीचा देखील उल्लेख केला. समोर कोण आहे याचा विचार न करता, अजित पवार हे एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर सरळ प्रतिक्रिया देत असल्याचे देखील आबिटकर यांनी म्हटले आहे. यावेळी प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, पुण्यात सात दवाखान्याचे उद्घाटन आपण करत आहोत. त्याचबरोबर अकोल्यात एक, अमरावतीत चार, कोल्हापूर मध्ये दहा, नाशिकमध्ये चार, ठाण्यात 13 अशा रुग्णालयाचे उद्घाटन आज होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाचे काम गतिशील करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा देखील त्यांनी केला. आरोग्य विभागातील सर्व कामे ही जलद गतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आम्ही ही कामे करत असल्याचे देखील आबिटकर यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली राज्यातील जनतेला पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम आमच्या वतीने सुरू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारची कोणतेही कार्यालय ही भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत. यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून जनतेला उत्तम प्रकारे सेवा सुविधा देण्यावर आमचा भर असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षात या सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश देखील यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना पवार यांनी दिले आहेत.